मनतरंग



     नित्य व्यवहारात आपला वेगवेगळ्या लोकांशी परीचय होतो. त्यांच्याशी बोलताना, वावरताना, त्यांचा स्वभाव कळतो. वरवर शांत भासणार्या व्यक्तीच्या अंतरंगात माजलेली खळबळ कळून येते. काहीजण आरशासारखे स्वच्छ, नितळ असतात, काही तसे भासवतात, पण चेहरा कधी कधी जे सांगायचे ते सांगून जातो.

     मग मनात विचार येतात, अरे, किती वेगळेपण आहे ना याच्यात, इतके दिवस, इतकी वर्षे,  ह्याचा परीचय आहे पण त्याचे हे वेगळेपण कधी उमगलेच नाही.  आपण ह्याला समजूच शकलो नाही. किती चांगले विचार आहेत याचे, तर कधीकधी  अतिशय निकटची व्यक्तीही अकल्पीत धक्का देउन जाते.

     विचारांच्या लाटांवर स्वार होउन आपण आपली गफलत शोधत असतो. कधी उत्तर सापडते, तर कधी नाही. कधी आपण बरोबर असतो, कधी समोरचा. ह्या धावपळीत चेहऱ्यांचे निरीक्षण करण्याची सवय लागली व एक वेगळेच विश्व समोर उभे राहीले.

     घडलेल्या एकाच घटनेतील, वेगवेगळ्या मनांतून उमटलेले वेगवेगळे तरंग वाचताना एक वेगळीच अनुभुती आली. मग सवय लागली या गोष्टीची, आणि  त्याने जीवन एका विशिष्ट चाकोरीतून बाहेर पडले. यातून बरेच काही शिकलो, शिकत आहे, व शिकत रहावयाचे आहे. कशामुळे घडते हे सारे? मनातील वेळी, अवेळी उठणाऱ्या विविध तरंगातून. होय,  ह्या सर्व घटना माझ्या साठी मनामनांचे तरंग आहेत. म्हणून माझ्या ब्लॉगचे नाव आहे  मनतरंग.

0 comments: